म्हसवड दि. ११ ( महेश कांबळे )
माण तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणुन ज्या म्हसवड शहराची ओळख आहे, त्याच म्हसवड शहरात दि.१० रोजी झालेल्या दुचाकींच्या अपघातांमध्ये राकेश गजानन तिवाटणे या५५ वर्षीय व्यक्तीचा दुर्देवी मृत्यु झाला, राकेशच्या निधनामुळे शहरात खरेतर सर्वत्र खुप हळहळ व्यक्त होत असली तरी या हळहळीबरोबरच एक खंतही व्यक्त होत आहे, ती खंत म्हणजे जर या ठिकाणी गतीरोधक असता तर कदाचित राकेश वाचला असता अशीही चर्चा सध्या शहरात सुरु असुन राकेशच्या या दुर्देवी मृत्युमुळे पुन्हा एकदा शहराला जोडणार्या महामार्गावरील गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
राकेश व त्याचा मित्र शहाजी हे दोघेजण माळशिरस चौकातुन पंढरपुर रोडच्या दिशेने असलेल्या मानेवस्ती येथे निघाले असताना पंढरपुर च्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या दुचाकी ने त्यांच्या दुचाकीस एवढी जबरदस्त धडक दिली की त्या धडकेत राकेशचा दुर्दैवी मृत्यु झाला, मात्र हा मृत्यु कदाचित याठिकाणी नसलेल्या गतीरोधकामुळेच झाला आहे अशीच आता चर्चा सुरु आहे. म्हसवड शहराला जोडणार्या या चौकात एक रस्ता माळशिरसवरुन येतो तर एक पंढरपुर वरुन येतो, हे दोन्ही मार्ग राज्य महामार्ग असल्याने या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये – जा सुरु आहे, महामार्गावर कोठेच गतीरोधक उभारता येत नयले तरी हे महामार्ग ज्या शहराला जोडले जातात त्याठिकाणी तरी किमान गतीरोधक उभारले जावेत, यापुर्वीही येथील मायणी चैकात असाच मोठा अपघात होवुन त्यामध्ये एक युवक व एका युवती ला आपला जीव गमवावा लागला आहे, त्यावेळीही शहराला जोडणार्या या महामार्गावर गतीरोधक बसवावेत अशी चर्चा सुरु झाली. त्यानंतर काही दिवसांनी या मायणी चौकात गतीरोधक बसवण्यात आले मात्र कालांतराने ते पुन्हा काढण्यात आले.
त्याठिकाणी जर गतीरोधक असते तर तेथेही त्या युवक – युवतीचे प्राण त्यावेळीही कदाचित वाचले असते. मात्र दुर्दैवी घटना घडली की तेवढ्यापुरती हळहळ आणी तेवढ्यापुरती मागणी होत असल्याने रस्ते विभाग ही याकडे दुर्लक्ष करीत आहे. वास्तविक म्हसवड शहराला जोडणार्या प्रत्येक महामार्गावर गतीरोधक उभारणे ही काळाची गरज बनली आहे. त्या बरोबरच अंतर्गत रस्त्यामध्येही गतीरोधक उभारणे ही सध्याची गरज बनली आहे, सध्याची युवा पिढी ही फारच बेदरकारपणे दुचाक्या दामटत असल्याने अपघातांचे प्रमाण खरेतर खुपच वाढले आहे. तरुणाईला धुम स्टाईलने दुचाकी दामटली की आपण कोणीतरी वेगळे आहोत असे वाटत असल्याने शहरांतर्गत असलेल्या रस्त्यावरुन व गल्लीबोळातुनही कर्नकर्कश्य हॉर्न वाजवत दुचाक्या पळवणारे अनेक हिरे रोज फिरत आहेत, त्यांना ना माणसांची भिती ना कायद्याची भिती वाटत नसल्यानेच राजरोसरणे हे दुचाकीस्वार एखाद्याचा काळ बनुन शहरात फिरत आहेत.
राकेशच्या दुचाकी ला ठोकर देणारे दुचाकीस्वॉर ही ट्रिपल सिट होते अशी माहिती समोर येत असुन त्यापैकी काहीजण तर अल्पवयीन असल्याचेही समजते. खरेतर अल्पवयीन दुचाकीस्वॉराकडुन एखादा अपघात घडल्यास त्यांच्या वडीलांवर गुन्हा दाखल करण्याची कायद्यात तरतुद आहे, मात्र अनेकदा या कायद्याचे पालन केले जाते का ? हा प्रश्न ही या निमीत्ताने उपस्थित होत आहे. यापुर्वीही अनेकदा अल्पवयीन चालकांकडुन अपघात घडले आहेत मात्र आजवर कधीच त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत त्यामुळे त्यांच्या मनात कायद्याची भितीच उरलेली नाही तर पालकांमध्येही अशी कारवाई आपल्यावर होत नसल्याचा मोठा गैरसमज निर्माण झाला असल्याने ते पण कधी आपल्या अल्पवयीन पाल्याला दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालवण्यास टोकत नाहीत, परिणामी असा कधीतरी कोठेतरी कोणालातरी आपला जीव गमवावा लागतो.
राज्य महामार्गावर गतीरोधक बसवता येत नाहीत असेच समर्पक उत्तर या विभागाकडुन नेहमी दिले जात असले तरी गोंदवले येथे मात्र या महामार्गावर गतीरोधक ठिकठिकाणी बसवण्यात आले आहेत. मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल पाटील यांच्या रेट्यापुढे या विभागाला नतमस्तक व्हावे लागल्यानेच गोंदवले याठिकाणी गतीरोधक उभारण्यात आले आहेत. झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये हेच गोंदवलेच्या पाटलांनी दाखवुन दिले आहे.
गोंदवले प्रमाणेच म्हसवडमध्येही यासाठी जनरेटा उभारणे गरजेचे बनले आहे, त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय गतीरोधकाविना होणारे मृत्यु थांबणार नाहीत. तर पोलीसांनीही अल्पवयीन चालकांविरोधात व धुमर स्टाईलबाजी विरोधात तीव्र मोहीम उघडुन कायद्याचा जरब बसवावा लागेल तरच अशा घटनांना थोडाफार आळा बसेल. म्हसवड नगरपरिषदेनेही शहरअंतर्गत रस्त्यावरही गतीरोधक गरजेनुसार बसवुन उभारणे गरजेचे आहे. म्हसवड पालिका हद्दीत चांदणी चौक, शिंगणापुर चौक, रथगृह बायपास रोड, माळशिरस चौक, मायणी चौक, मरीआई मंदिर बायपास रोड आदी ठिकाणी तरी किमान गतीरोधक उभारणे गरजेचे बनले आहे. भविष्यात यापुढे कोणाचा अपघाती बळी जावु नये याकरीता म्हसवडकरांनी गतीरोधकासाठी एकत्र येत यासाठी आवाज उठवणे हीच खरी आजवरच्या अपघाती मृत़्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली ठरणार आहे.०
बातमी एवढी चांगली लिहिली आहे की महेश साहेबांना अनेक दंडवत प्रणाम तुमच्या या लढ्याला माझी पूर्णपणे साथ आहे