कडाडलेल्या विजेने घेतला शेतकर्याचा बळी, माण तालुक्यातील तोंडले गावातील घटना
म्हसवड दि. २
आज दुपार पासुन माण तालुक्यात अचानक वादळी वार्यासह काहीठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत असतानाच अचानक विजेचा कडकडाट सुरु झाला अशातच एक विज तोंडले गावच्या हद्दीतील माळरानावरील एका बाभळीच्या झाडावर कोसळली, मात्र पाऊस येतोय म्हणुन त्याच बाभळीच्या झाडाशेजारी आश्रयाला थांबलेल्या एक पशु पालक शेतकर्याच्या त्या विजेच्या धक्क्याने जीव घेतला, लाला जाधव असे त्या पशुपालक दुर्देवी शेतकर्याचे नाव असुन त्यांच्या आकस्मिक जाण्याने तोंडले गाव मात्र शोकसागरात पुरते बुडाले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी तोंडले गावातील पशु पालक शेतकरी असलेले लाला जाधव हे नेहमीप्रमाणे आपल्या जनावरांसह तोंडले वारुगड रस्त्यावर असणाऱ्या माळ रानात शेळ्या घेऊन चारण्यासाठी गेलेले होते पण लाला जाधव यांना कल्पनाही नव्हती की हा दिवस त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरेल. दुपारच्या सुमारास अचानक आभाळ दाटून आले, वाऱ्याचा वेग वाढला आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यातच विजांचा कडकडाट सुरू झाला.
या भीषण वातावरणात अचानक एका बाभळीच्या झाडावर वीज कोसळली. दुर्दैवाने त्या झाडाजवळच उभे असलेले लाला जाधव विजेच्या तडाख्यात सापडले आणि क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. निसर्गाच्या या रौद्र रूपाने एक कुटुंब उद्ध्वस्त झाले.
दरम्यान, संध्याकाळ होत आली तरी लाला जाधव घरी परतले नाहीत. मात्र, त्यांच्यासोबत असलेली जनावरं आणि शेळ्या एकट्याच घरी परतल्याने घरच्यांच्या मनात भीतीची धाकधूक निर्माण झाली. काहीतरी अनर्थ घडल्याची चाहूल लागताच कुटुंबीयांनी तात्काळ रानात धाव घेतली.
ते नेहमी ज्या ठिकाणी जनावरं चारण्यासाठी जात असत, त्या परिसरात शोध घेत असताना बाभळीच्या झाडाजवळ लाला जाधव निपचीत अवस्थेत पडलेले दिसले. हे दृश्य पाहताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. त्यांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर सुन्न झाला.
पावसाच्या सरींमध्ये एक जीव कायमचा अनंतात विलीन झाला होता. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जाधव कुटुंबाला धीर दिला.
या घटनेनंतर ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी करण्यात येत आहे. शासकीय सोपस्कार पूर्ण करून आपत्तीग्रस्त कुटुंबाला आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.०००