Skip to content
mandand.online mandand.online
mandand.online mandand.online
  • Home
  • Privacy Policy
  • Home
  • Privacy Policy
महाराष्ट्र

श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी रथोत्सव लेख

By mandand76@gmail.com
November 20, 2025 6 Min Read
0
श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवी

 

म्हसवड दि. २० ( महेश कांबळे )
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान व म्हसवड नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवी चा रथोत्सव हा शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर रोजी संपन्न होत असुन या निमित्त श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी या उभय दैवतांचा रथोत्सव होत आहे, या रथोत्सवासह उभय दैवतांची महंती सांगणारा हा लेख खास आमच्या वाचकांसाठी
म्हसवडचा सिद्धनाथ हे महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यांतील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यातील माणगंगेच्या तीरावर म्हसवड येथे श्री. सिद्धनाथांचे दहाव्या शतकातील हेमाडपंथी, भव्य दगडी मंदिर आहे. मंदिरातील भुयारात काशी-विश्‍वेश्‍वराची स्वयंभू शिवपिंड आहे. शिवाचे रक्षक म्हणून श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरी हे स्थान मानले जाते. श्री सिद्धनाथ, भैरवनाथ, सिद्धेश्‍वर, कालभैरव, महाकाळ, शिदोबा आदी नावानेही देवाचा उल्लेख केला जातो.
श्रीधर स्वामींच्या “काशिखंड’ या ग्रंथामध्ये काळभैरवाची उत्पत्ती कशी झाली? त्यासंबंधीचा उल्लेख आढळतो. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण? असा वाद एकदा त्रैलोक्‍यात निर्माण झाला. त्यावेळी गायत्री म्हणाली, शिवस्वरूप ब्रह्म अगम्य आहे. शिवाच्या अधीन सर्व काही असते, त्यामुळे सर्वश्रेष्ठ एक शिवच आहे. हे ऐकून ब्रह्मा व विष्णू यांना राग आला व त्यांनी गायत्री आणि शिवाचा निषेध केला. हा निषेध ऐकून शिवशंकरांना क्रोध अनावर झाला व त्यांनी आपला उजवा हात क्रोधाने झटकला. त्यावेळी शिवाच्या उजव्या भूजदंडापासून महाकाळ म्हणजेच काळभैरवांची उत्पत्ती झाली. त्यावेळी शिवश्रेष्ठत्वाची सर्वांना प्रचिती आली. लिंगरुपाने शिव भुयारात स्थित झाले व रक्षणकर्ते शिवअवतार स्वरूप म्हणून कालभैरव व जोगेश्‍वरी गाभाऱ्यातील सिंहासनावर आरुढ झाले, अशी अख्यायिका आहे.
भुयारातील शिवलिंग वर्षातून
एकवेळ म्हणजे फक्त महाशिवरात्रीच्या रात्री भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुले असते. तेवढी रात्र संपल्यावर भुयार वर्षभर बंद असते. या बंद भुयाराच्या प्रवेशद्वाराजवळ एक छोटासा पलंग ठेवलेला असून, त्यावरील गाद्यांवर श्री सिद्धनाथ व जोगेश्‍वरी यांच्या पंचधातूच्या उत्सव मूर्ती कायम वर्षभर ठेवलेल्या असतात.
भुयारातील स्वयंभू शिवपिंडीच्या बरोबर मध्यावर असणाऱ्या गाभाजयातील सिंहासनावर श्री सिद्धनाथ व जागेश्‍वरी देवी यांच्या गंडकी शिलेवर कोरलेल्या व अप्रतिम कोरीव काम केलेल्या रेखीव मूर्ती उभ्या आहेत. बाहेरील भागात अनेक देव-देवतांच्या मूर्ती आहेत. बाहेर उजव्या बाजूस एक मोठे व वेगळे शिवलिंग आहे. त्याच्या शेजारी असलेल्या नंदीजवळील भिंतीवर कन्नड भाषेत कोरलेला एक शिलालेख आहे. शिलालेखाची वरच्या भागाची रुंदी ४९ सेंटीमीटर व खालील भागाची रुंदी ६५ सेंटीमीटर आणि लांबी ११० सेंटीमीटर आहे. एवढ्या भागात एकूण ४३ ओळी आहेत. याची लिपी मध्यमयुगीन कन्नड आहे. प्रारंभीचा मंगलश्‍लोक आणि शेवटचा आशीवार्दात्मक श्‍लोक हे संस्कृतमध्ये आहेत. उर्वरित सर्व मजकूर कन्नड भाषेत आहे. या शिलालेखाचे मराठी भाषांतर सोलापूरचे आनंद कुंभार यांनी शासनाच्या संशोधन तरंग या मासिकात केले आहे. त्यावरून हा शिलालेख इ. स. ११४८ साली कल्याण चालुक्‍य चक्रवर्ती जगदेकमल्ल (दुसरा) या राजाच्या कारकिदीर्तील कारागिरांनी कोरलेला आहे हे स्पष्ट होते. या राजाने म्हसवड येथील जमीन सिद्धेश्‍वर देवास दान दिली, असा उल्लेख या शिलालेखात आढळतो.
श्री सिद्धनाथ मंदिरात परंपरेनुसार कार्तिक शुद्ध एक (दिवाळी पाडवा) या दिवशी पहाटे गाभाजयाजवळ असणाऱ्या देवापुढे मंदिराचे मुख्य पुजारी, सालकरी यांच्या हस्ते मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत घटस्थापना केली जाते. म्हसवड गावात व इतरत्र श्री नाथांना कुलस्वामी मानणारे भक्त आपापल्या घरी घटस्थापना करतात. हे घट बारा दिवसांचे असतात. सर्व पुजारी व भाविक या काळात बारा दिवस उपवास करून श्रींची भक्ती करतात, याला नवरात्र म्हणतात. देवीचे नवरात्र नऊ दिवसांची असते. मात्र, श्री सिद्धनाथांचे हे नवरात्र १२ दिवसांचे असते. घटस्थापनेपासून नवरात्रारंभ होतो. याच दिवशी दुपारी १२ वाजता श्रींचा हळदी-समारंभ होतो. श्री सिद्धनाथ-जोगेश्‍वरी यांच्या पंचधातूच्या उत्सवमूर्तींना हळदी लावण्याच्या कार्यक्रमात येथील गुरव समाज, गावातील तसेच परगावच्या हजारो महिला सहभागी होतात. ढोल, सनई-चौघडा, बॅंड यांच्या मंगल गजरात हा हळदी समारंभ होतो.
घट बसलेल्या दिवसांपासून बारा दिवस उपवास करून येथील गुरव समाज, शहरातील महिला-पुरुष, आबालवृद्ध पहाटे चार वाजल्यापासून कार्तिक स्नान करून माणगंगेच्या पात्रातून संपूर्ण नगरप्रदक्षिणा घालतात. मंदिरात काही पुजारी व भक्तगण बारा दिवस अहोरात्र उभे राहून श्रींची उपासना करतात. याला उभे नवरात्र म्हणतात. ही परंपरा अव्याहत, अखंडपणे सुरू आहे.
कार्तिक शुद्ध १२ (बारस-तुलसी विवाह) रोजी रात्री साडे ११ वाजता मंदिराच्या बाहेरील हत्ती मंडपातील सुशोभीत केलेल्या हत्तीवरील अंबारीत बसवण्यात आलेली श्रींची मूर्ती विवाहासाठी मंदिराचे मुख्य पुजारी गाभाऱ्यात नेतात. गाभाजयात जोगेश्‍वरी देवीच्या मूर्तीसमोर अंतरपाट धरून मंगलाष्टकांसह पारंपारिक, धार्मिक, विधिपूर्वक, शास्त्रोक्त पद्धतीने रात्री १२ वाजता मोठ्या थाटाने श्री सिद्धनाथ जोगेश्‍वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होतो. बाहेरील हत्ती मंडपातून श्री सिद्धनाथांची मूर्ती गाभाऱ्यात नेत असताना हजारो भाविक-भक्तिभावाने मूर्तीस स्पर्श करण्यास धडपडत असतात, कारण श्रींच्या मूर्तीस स्पर्श झाल्यावर संपूर्ण वर्ष सुख-समृद्धीचे व भरभराटीचे जाते अशी श्रद्धा आहे. श्रींची मूर्ती गाभाऱ्यात नेल्यानंतर पुरोहितांमार्फत धार्मिक विधीनुसार श्रींचा विवाह सोहळा संपन्न होतो.
या सिद्धनाथ मंदिरातील मुख्य पुजारी-सालकरी असतात. ते वर्षभर संन्यस्त राहून सकाळ-संध्याकाळ शुचिर्भूत होऊन श्रींना पंचामृत व गरम उदकाने स्नान, दररोज विविध अवतारातील पूजा, पहाटे पाच वाजता काकड आरती, सकाळी साडेआठ वाजता मुख्य आरती, दुपारी तीन वाजता धुपारती, रात्री साडेआठ वाजता मुख्य आरती व रात्री दहा वाजता शेजारती अशी दिवसातून पाच वेळा श्रींची आरती अखंडपणे करतात.
सालकरी यांना भाविक पूज्य मानतात. हे वर्षभराचे अत्यंत कडक व कठीण असे व्रत आहे. साल करणऱ्यांना अतिशय कडक व कठीण नियमांचे तंतोतंत पालन करावे लागते. साल करणाऱ्यांचा विवाह होणे आवश्‍यक असते. अविवाहितास साल करता येत नाही. साल हे वैशाख शुद्ध पौर्णिमेस दरवर्षी बदलत असते. एकदा साल सुरू झाले की साल करणाऱ्यांना या काळात ब्रह्मचर्य पाळावे लागते. सकाळ-संध्याकाळ सुचिर्भूत होऊन देवाचे स्नान घालणे, पूजा बांधणे, आरती करणे हा सर्व धार्मिक विधी सालकजयांना वर्षभर अखंडपणे, नियमितपणे व अगदी ठरलेल्या वेळेवरच करावा लागतो. सालकरणऱ्यांना वर्षभर पांढरे धोतर, पांढरी बाराबंदी, पांढरा फेटा व खांद्यावर उपरणे याच पेहेरावात राहायचे असते. वर्षभर पायात चप्पल घालायची नसते. त्या ऐवजी लाकडी खडावा वापरावयाच्या असतात. वर्षभर कितीही महत्त्वाचे अगदी कोर्टाचे काम असले तरी गावाची वेस ओलांडून जायचे नसते. वर्षभर केस कापायचे नाहीत. दाढी करायची नाही आणि विशेष म्हणजे कोणालाही नमस्कार करावयाचा नसतो. कारण सालकरी म्हणजे देवअवतार मानले जातात. वर्षभर सकाळी व रात्री मुख्य आरती झाल्यानंतर सालकऱ्यांच्या घरचा नैवेद्य श्रींना त्यांच्याच हस्ते दाखवला जातो. वर्षभर मंदिरातच वास्तव्य करावयाचे असते. घर, संसार, प्रपंच, मुले-बाळे हे काहीही सालकऱ्यांनी पाहावयाचे नसते. अशा प्रकारे अत्यंत कडक व कठीण नियमांचे पालन करून श्रींची सेवा करावयाचे हे एक कडक वृत्त आहे. येथील गुरव व भाविकांनी श्री सिद्धनाथ मंदिराचे पावित्र्य वषार्नुवर्षे अखंडपणे व अव्याहतपणे जोपासले आहे. गावाचे व भाविकांचे एकमेव श्रद्धास्थान असणारे हे सिद्धनाथ मंदिर त्यामुळेच एक जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे.
मानवी समाजामध्ये ज्या पद्धतीने हळदी-समारंभ, विवाह व नंतर वरात आदी कार्यक्रमांनी विवाह सोहळा होतो, त्याच पद्धतीने येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरी यांचा हळदी समारंभ, विवाह व वरात हे कार्यक्रम होतात. दिवाळी पाडव्यादिवशी हळदी समारंभ पार पडला. त्यानंतर कार्तिक शुद्ध ११ तुलसी विवाहादिवशी श्रींचा विवाह सोहळा झाला आणि आज मार्गशीर्ष शुद्ध शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर रोजी विवाहानंतरची वरात म्हणजेच श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरीची रथयात्रा होत आहे.
या रथयात्रेची सुरवात मानकरी राजेमाने यांच्या राजवाड्यातून होते या रथोत्सवाच्या आदल्या दिवशी आमावस्येला रथाचे कळस व मानाची वस्त्रे रथावर चढवली जातात व रथोत्सवाच्या दिवशी सकाळी श्रींचा नैवद्य व सिंहासन हे राजेमाने मानक-यांच्या राजवाड्यातून मंदिरात जाते व तेथूनच ते सिंहासन व नैवद्य यात्रा पटांगणावरील रथामध्ये नेला जातो व मानक-यांच्या उपस्थितीत मंदिरातून श्रींच्या उत्सव मुर्ती पालखीतून रथापर्यंत नेल्या जातात यावेळी भाविक गुलाल खोब-यांची उधळण करतात हि पालखी रथाजवळ आल्यानंतर मानकरी राजेमाने यांच्या उपस्थितीतच श्रींच्या उत्सव मुर्ती रथामध्ये विराजमान केल्या जातात व परंपरेनुसार या रथामधिल श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मुर्तीचे पुजन करून रथाचे पुजन करून रथ मार्गस्त करून रथोत्सवास प्रारंभ होतो हि रथ प्रदक्षिणा म्हसवड शहराला उजवी नगरप्रदक्षिणा घालुन पुन्हा रथ यात्रा पटांगणावर येतो यावेळी या रथावर राजेमाने यांचा मान असतो तर हा रथ ओढण्याचा मान हा येथिल माळी समाजाचा असुन या रथाची देखभाल व दुरूस्ती करण्याचा मान लोहार व सुतार समाजाचा आहे तर इतर बाराबलुतेदारांचा मान या रथोत्सवात असतो.

चौकट :-
दणकट, मजबूत आणि भव्य अशा लाकडी चंदनाच्या रथामध्ये श्रींच्या उत्सवमूर्ती दुपारी ११ वाजता बसवल्या जातात. रथाला मोठे जाडजूड दोर बांधून माणसांनी हा रथ ओढला जातो. याबरोबरच रथाची देखभाल करण्याचा व रथावर बसण्याचा मान येथील राजेमाने घराण्याला असून यात मानकरी श्रीमंत अजितराव राजेमाने, श्रीमंत गणपतराव आबासाहेब राजेमाने, श्रीमंत शिवराज आबासाहेब राजेमाने, श्रीमंत प्रतापसिंह राजेमाने, श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, श्रीमंत सयाजीराजे राजेमाने यांचा मान असुन हा रथ ओढण्याचा मान येथील माळी समाज व बारा बलुतेदारांनाही आहे. माणगंगेच्या पात्रातून शहराला उजवी प्रदक्षिणा घालून दुपारी १२ वाजता सुरू होणारी हि रथप्रदक्षिणा रात्री उशीरा यात्रा पटांगणावर येवुन थांबते यावेळी या रथ प्रदक्षिणा दरम्यान यात्रेला येणारे भाविक हे या रथावर गुलाल खोब-याची उधळण करत सिध्दनाच्या नावाने चांगभले च्या घोषणा देतात.०००

Post Views: 2
Author

mandand76@gmail.com

Follow Me
Other Articles
Previous

पालिका निवडणुक भयमुक्त व पारदर्शी व्हावी – अनिल देसाई

Next

म्हसवड पालिकेसाठी नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी तर सदस्यांसाठी दुरंगी लढत होणार

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • शिक्षण क्षेत्रातील हिरा ठरतोय अनेकांचा आधार.
  • स्वच्छ बस स्थानक स्पर्धेत म्हसवड पुणे विभागात द्वितीय
  • नुतन जलवाहिनीला लागली गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • माळशिरस चौक ते बेघर वसाहतीमधील रस्त्याची दुरावस्था
  • चार्या, पाण्याविना मुके बछडे फोडतय हंबरडा

Recent Comments

  1. Dnyaneshwar Mangrule on राकेश च्या मृत्यु ने गतीरोधकाचा प्रश्न ऐरणीवर
  2. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Uncategorized
  • क्राईम
  • धार्मिक
  • निवडणूक २०२५
  • प्रशासन
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Copyright 2026 — mandand.online. All rights reserved. Blogsy WordPress Theme