म्हसवड दि. १०
शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान मिळावे या हेतूने आयोजित केलेल्या म्हसवड येथील क्रांतिवीर शाळेच्या बाल बाजारातून विद्यार्थी, पालक व ग्राहक यांच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल झाली असून विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हसवड येथे बाल बाजाराचा शुभारंभ म्हसवड वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. निसार काझी, साहित्यिक अजित काटकर, यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर, सचिव सुलोचना बाबर, उपाध्यक्ष ॲड. इंद्रजीत बाबर , मुख्याध्यापक अनिल माने व पूनम जाधव, शिक्षक पालक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ॲड. निसार काझी म्हणाले क्रांतिवीर शाळेने राबवलेला बाल बाजार उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. विविध स्वरूपाच्या व्यवहारिक ज्ञानाची ओळख व्हावी, शेतमाल माहिती, विविध फळभाज्या, पालेभाज्यांची ओळख याबरोबर चलनाची देवाणघेवाण यासाठी बाल बाजार मार्गदर्शक ठरणार आहे. यावेळी बोलताना साहित्यिक अजित काटकर म्हणाले क्रांतिवीर शाळेचे हे वर्ष रोप्य महोत्सवी असून शाळेने आजवर अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवल्याने शाळेचे नाव राज्यस्तरावर पोहोचले आहे. उपक्रमशीलता हा शाळेचा आत्मा असून संस्था अध्यक्ष विश्वंभर बाबर व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर तसेच शिक्षकांचे सुयोग्य नियोजन असल्यामुळेच शाळेतून सर्व गुणसंपन्न हजारो आदर्श विद्यार्थी घडले आहेत .
या निमित्ताने विश्वंभर बाबर यांनीही आपले विचार व्यक्त केले . यावेळी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी बाल बाजाराची संकल्पना स्पष्ट करून शाळेतील विविध उपक्रमाची माहिती दिली. उपस्थित पाहुणे व मान्यवरांनी विद्यार्थी विक्रेत्या कडून फळे, भाजीपाला खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
या बाल बाजारात 625 हून जास्त विद्यार्थी सहभागी झाले तसेच एकूण 2 लाख 50 हजार रुपयाची उलाढाल झाल्याची माहिती संयोजकांनी दिली.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक पालक तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.००
