म्हसवड दि. १२
म्हसवड शहरातील प्रत्येक गल्लीबोळात भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर झाली असुन या भटक्या श्वानांमुळे लहान मुले, वृध्द अबाल वृध्दांमध्ये कमालीची भिती पसरली आहे, पालिकेने शहरातील वाढत्या श्वानांचा चोख बंदोबस्त करुन शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा.
शहरातील भटक्या श्वानांची वाढलेली संख्या ही एक समस्या बनली असुन या समस्येमुळे शहरातील प्रत्येक गल्ली बोळात मोकाट कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. यापुर्वी शहरातील अनेकांचा चावा या भटक्यांनी घेतला आहे. झुडींच्या झुंडी मोकाट कुत्र्यांच्या फिरत असल्याने जेष्ठ नागरीकांमध्ये त्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणावर झाली असुन त्यांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. गल्ली बोळासह शहरातील मुख्य रस्त्यावर देखील ही कुत्री टोळीने फिरत असुन त्यांच्यातील भांडणे ही अनेक मनुष्याच्या अंगावर आली आहेत, तर रस्त्यावरुन जाताना अनेक वादचार्यांच्याही ते मागे लागत असल्याने अनेकांना रस्त्यावरुन जाताना सुध्दा जीव मुठीत घेवुनच जावे लागत आहे. कधी, कोठुन एखादे भटके श्वान येईल आणी कोणाचा चावा घेईल याचा काही नेम नसल्याने या भटक्या कुत्र्यांची नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
दुचाकी स्वाराच्याही ही श्वाने मागे धावत असल्याने अनेक दुचाकीस्वार दुचाकीवरुन पडुन गंभीर जखमी झाल्याच्या घटना दररोज घडत आहे. हे भटके श्वान जर एखाद्याला चावले तर त्यासाठी लागणारे इंजेक्शन ही अनेकदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्यावर अनेकदा रुग्णांना दहिवडी किंवा गोंदवले येथील रुग्णालयात हेलपाटे मारावे लागले आहेत. शाळा परिसरातही या भटक्या कुत्र्यांनी अक्षरशा हैदोस घातला असल्याने याठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांवर सतत टांगती तलवारच कुत्र्यांनी निर्माण केली आहे. शहरात मोकाटपणे फिरणार्या या कुत्र्यांना कोणीही खायला घालु नये, जर कोणी त्यांना खायला घालत असेल आणी असे जर भटके श्वान एखाद्याला चावले तर संबधित व्यक्ती की जो अशा भटक्या कुत्र्यांना खायला घालतोय त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत, मात्र याकडे असे दानवीर लक्ष देत नाही परिणामी अशा भटक्यांना खाऊ घालणारे दानवीर आता अनेक गल्लीबोळात निर्माण झाले आहेत.
भटक्या कुत्र्यांना पकडुन त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मुख्य जबाबदारी ही पालिकेची असते, मात्र शहरातील भटक्यांची संख्या पाहता येथील पालिका आपली जबाबदारीच विसरली असल्याचे दिसुन येत आहे, परिणामी दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या अधिकाधिक वाढु लागली असुन त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. म्हसवड पालिकेत आता एकहाती सत्ता भाजपची असुन या सत्ताधार्यांनी सर्वसामान्य म्हसवडकरांना दिलासा देण्यासाठी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर घेत याकडे गांभिर्याने लक्ष देवुन कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेवुन नागरीकांना भयमुक्त करावे, या भटक्या श्वानांना पकडण्यासाठी लवकरात लवकर उपाय योजना राबवावी अशी मागणी सर्व सामान्य म्हसवडकर जनतेतुन होत आहे.
