म्हसवड दि. २५
महिलांना राजकिय संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राष्ट्रवादीचे योगदान मोठे आहे, असे असले तरी म्हसवड मधील महिलांना आज ही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असुन त्यांच्या साठी शहरात कोणत्याच सोयी सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे या गैरसोयीमुळे महिलांची कुचंबना होत असुन महिलांना सक्षम बनवण्याबरोबरच त्यांच्या अडचणी, व गैरसोयी दुर करण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भुवनेश्वरी राजेमाने यांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले.
म्हसवड पालिका निवडणुकीसाठी भाजप विरोधी सिध्दनाथ नागरिक आघाडी असा थेट सामना होत आहे, भाजपकडुन ना. गोरे हे प्रतिस्पर्धी असलेल्या सर्व पक्षीय आघाडीला धक्का देण्यासाठी मजबुतीने किल्ला लढवत आहेत, तर विरोधी असलेल्या सिध्दनाथ नागरिक आघाडीकडुन माजी मंत्री महादेव जानकर, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, प्रा. कविता म्हेत्रे यांनी भाजप विरोधात एकत्र येत एकास एक उमेदवार देत निवडणुकीत रंगत आणली आहे, प्रचाराचा धडाका दोन्हींकडुन सुरु आहे, मात्र नगराध्यक्ष पदाची निवडणुकी ही प्रतिष्ठेची मानली जात आहे. सिध्दनाथ नागरिक आघाडीकडुन थेट नगराध्यक्ष पदासाठी येथील राजे घराण्यातील माजी नगराध्यक्ष श्रीमंत अजितराव राजेमाने यांच्या सुष्ना श्रीमंत भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने यांनाच उतरवण्यात आल्याने सर्वांचेच लक्ष या लढतीकडे लागले आहे.
म्हसवड पालिका निवडणुकीत महिलांचे अनेक प्रश्न हाती घेवुन मतदारांना साद घालणार्या भुवनेश्वरी राजेमाने यांनी स्वत: बरोबरच सर्वच प्रभागातील उमेदवारांचा प्रचार त्या करीत असुन सकाळपासुनच त्या पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे घरोघरी फिरुन मतदारांशी संवाद साधत आहेत. महिला मतदारांच्या काय अपेक्षा आहेत या ही त्या जाणुन घेत आहेत. वाड्याबाहेर गेलेली सत्ता पुन्हा वाड्यात आणण्यासाठीच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे त्या सांगत आहेत, तर येथील राजेमाने कुटुंब यांनी संपूर्ण शहरालाच आपला परिवार मानला असुन शहराचा रचनात्मक विकास हाच आपला ध्यास असल्याचे त्या सांगत आहेत. शहरात अनेक मुलभुत सुविधा नसल्याने अनेकांची गैरसोय होत आहे त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच शहराला दहशतमुक्त व सुसंकृत बनवण्याचा आपला निर्धार असल्याचे त्या मतदारांशी संवाद साधताना सांगत आहेत. शहरातील नागरीकांना म्हसवडचा नगराध्यक्ष ठरवण्याचा गेलेला अधिकार त्यांना परत मिळवुन द्यायचा असुन संपूर्ण म्हसवड शहराची ओळख असलेले येथील राजेमाने कुटुंब यांच्या पाठीशी येथील सर्वसामान्य जनतेचे मोठे पाठबळ लाभले आहे.
आजवर म्हसवड पालिका निवडणुकीत फक्त आश्वासने दिली गेलीत पण प्रत्यक्ष विकास किती झाला याचेही जनतेने आत्मपरिक्षण करण्याचे आवाहन राजेमाने या मतदारांना करीत आहेत. म्हसवड शहरात अद्यापही रस्ते, विज, पाणी या मुलभुत सुविधा व्यवस्थित नाहीत, तर महिलांसाठी कोणतीही सुविधा नसल्याने महिलावर्गाच्या अडचणी कधी कोणी जाणल्याच नाहीत, महिलांसाठी घरगुती लघु उद्योग सुरु करुन त्यांना स्वावलंबी बनवणे हेच आपले प्रमुख काम असणार आहे, याबरोबरच म्हसवड शहर सुसंकृत शहर म्हणुन ओळखले जावे यासाठी आपण काम करणार असल्याचे त्या मतदारांना सांगत आहेत.०००

दि.२५ रोजी भुवनेश्वरी राजेमाने यांनी प्रभाग क्र. ६ मधील मतदारांशी संवाद साधताना तेथील वृषाल टाकणे व शिवमाला राजेमाने या प्रभागातील उमेदवारांना सोबत घेत या प्रभागातील अडचणी जाणुन घेतल्या यावेळी प्रभागातील मतदारांनी या तीन ही उमेदवारांच्या उमेदवारीचे समर्थन करताना आम्ही आपल्याच पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले. यावेळी माजी नगरसेविका श्रीमंत हिंदमालादेवी राजेमाने, तेजसिंह राजेमाने, अँड. पृथ्वीराज राजेमाने, जयसिंह राजेमाने, बाळासाहेब राजेमाने आदी प्रमुख उपस्थित होते.
