म्हसवड दि.२१ ( महेश कांबळे )
म्हसवड नगरपरिषदेच्या पंच वार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या निकालामध्ये भाजपने पहिल्याच फेरी पासुन आघाडी घेत म्हसवड पालिकेवर आपला झेंडा रोवला असुन, विरोधकांना पराभवाची धुळ चारताना नगराध्यक्ष पदासह सर्व ठिकाणी विजय मिळवत विरोधकांचा पुरता सुपडासाफ केल्याने भाजपचा हा एकतर्फी विजय झाल्याचे दिसुन येते.
२ डिसेंबर रोजी झालेल्या पालिका निवडणुकीत २१ जागेसाठी ४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते, यामध्ये म्हसवड पालिकेचे नगराध्यक्ष पद हे खुल्या वर्गातील महिलेसाठी आरक्षित असल्याने या पदासाठी ३ महिला निवडणुकीच्या उतरल्या होत्या, या निवडणुकीत भाजपकडुन पुजा सचिन विरकर, सिध्दनाथ नागरिक आघाडीकडुन भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने तर बहुजन समाज पार्टीकडुन रुपाली वाल्मिक सरतापे या तिन महिला निवडणुक लढवत होत्या, तर इतर १० प्रभागातुन काही अपक्षासह भाजप, शिवसेना व ठाकरे गट असे उमेदवार काही उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावित होते.
निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी पहिल्याच फेरीपासुन भाजपने विजय मिळवत घेतलेली आघाडी सर्वच प्रभागात कायम राहिली. प्रभाग १ भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुजा सचिन विरकर यांनी घेतलेली आघाडी पुढील सर्वच प्रभागातुन वाढतच गेली, कोणत्याही प्रभागातुन त्यांची आघाडी कमी न झाल्याने पुजा विरकर यांना ग्रामीण मतदारांसह शहरी मतदारांनाही मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे दिसुन आले. प्रभाग क्र. १ पासुन भाजपच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी कोणत्याच प्रभागात कमी झाली नसल्याने भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुजा सचिन विरकर या ४८४४ मतांनी विजयी झाल्या, तर भाजपच्या सर्व उमेदवारांनीही एकतर्फी विजय मिळवत पालिकेची सत्ता हाती घेतली आहे.
म्हसवड पालिकेची निवडणुक जाहीर झाल्यापासुनच भाजपचे ग्राम विकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती, २१ / ० करुन पालिकेची सत्ता हाती घेणार असल्याचे ते आपल्या प्रत्येक स्टेटमेंटमध्ये सांगत होते, त्यानुसार त्यांनी व्युवरचना करीत प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. आपल्या विश्वासु सहकार्यांसह प्रचाराचे नेटके नियोजन करीत मंत्री गोरे यांनी विरोधकांना सर्वच ठिकाणी धोबीपछाड देत पालिकेवर एकहाती भाजपचा झेंडा रोवला आहे.
कोणत्याही परिस्थितीत मंत्री गोरे यांना म्हसवड पालिकेची सत्ता द्यायची नाही असा चंग बांधलेल्या भाजपच्या सर्व विरोधकांनी एकत्र येत मंत्री गोरे यांच्यासमोर पालिका निवडणुकीत तगडे आव्हान दिले मात्र ते आव्हान कागदावरच तगडे ठरल्याचे आज झालेल्या निवडणुकीच्या निकालावरुन दिसुन आले.
प्रभाग निहाय झालेल्या मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे
प्रभाग क्र. १ ( अ )
चैताली अनिल शिंदे ( भाजप ) ४७८ मतांनी विजयी, ( ब ) विजय रामचंद्र धट ( भाजप ) १६३ मतांनी विजयी
प्रभाग क्र. २ ( अ ) सतीश शिवाजी मासाळ ( भाजप ) ३४६ मतांनी विजयी, ( ब ) सविता वसंत मासाळ (भाजप ) ३९१ मतांनी विजयी,
प्रभाग क्र.३ ( अ ) लखन मारुती लोखंडे ( भाजप ) ५२० मतांनी विजयी ( ब ) दिपाली धनंजय शिंदे ( भाजप ) ३०९ मतांनी विजयी,
प्रभाग क्र. ४ ( अ ) माधुरी महेश लोखंडे ( भाजप ) १३८ मतांनी विजयी, ( ब ) अकिल मैनुद्दीन काझी ( भाजप ) ३३५ मतांनी विजयी,
प्रभाग क्र. ५ ( अ ) श्रीदेवी निषांत पिसे ( भाजप ) ९९९ मतांनी विजयी, ( ब ) प्रज्योत किरण कलढोणे ( भाजप ) १२२३ मतांनी विजयी,
प्रभाग क्र. ६ ( अ ) आकाश बाळासाहेब पानसांडे ( भाजप ) १७० मतांनी विजयी, ( ब ) स्नेहल युवराज सूर्यवंशी ( भाजप ) १६० मतांनी विजयी,
प्रभाग क्र. ७ (अ ) प्रमिला जयंत ढाले ( भाजप ) २३६ मतांनी विजयी, ( ब ) युवराज दिनकर सूर्यवंशी ( भाजप ) ४९० मतांनी विजयी,
प्रभाग क्र. ८ ( अ ) अरुणा महेश गायकवाड ( भाजप ) ५८६ मतांनी विजयी, ( ब ) महावीर गिरजाप्पा विरकर ( भाजप ) ४९९ मतांनी विजयी,
प्रभाग क्र. ९ ( अ ) पुनम नारायण विरकर ( भाजप ) ५०८ मतांनी विजयी, ( ब ) विजय रामचंद्र बनगर ( भाजप ) ५१४ मतांनी विजयी,
प्रभाग क्र. १० ( अ ) स्वाती दिपक बनगर ( भाजप ) ५९१ मतांनी विजयी, ( ब ) अभिषेक आप्पा विरकर ( भाजप ) ४६९ मतांनी विजयी, हे भाजपचे नगरसेवकर पदाचे उमेदवार विजयी ठरलेत.
तर नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या पुजा सचिन विरकर व विरोधी आघाडीच्या भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने यांच्या मध्ये झालेल्या लढतीत भाजपच्या पुजा सचिन विरकर यांनी ४८४४ मतांनी विजयी मिळवत पालिकेतील थेट नगराध्यक्ष पदावर आपले नाव कोरले.
सर्व विजयी उमेदवारांचे व म्हसवडकर जनतेचे मंत्री जयकुमार गोरे व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी आभार मानले. पालिका निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर भाजपच्या सर्व विजयी उमेदवारांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधलण करीत मोठी आतिषबाजी करीत विजयाचा जल्लोष केला.
चौकट –
मंत्री गोरे यांनी दिलेला शब्द खरा करुन दाखवला –
म्हसवड पालिका निवडणुकीत मंत्री गोरे यांनी आपल्या उमेदवारांचा प्रचार करताना आपण २१ /० करुनच पालिकेची सत्ता ताब्यात घेणार असल्याचे सांगत २१ पेक्षा १ ही उमेदवार जर पराभुत झाला तर आपण अंगावर गुलाल घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार मंत्री गोरे यांनी पालिकेची सत्ता हाती घेताना नगराध्यक्ष पदासह सर्वच ठिकाणी आपले उमेदवार निवडुन आणत म्हसवडकरांना दिलेला शब्द खरा करुन दाखवला आहे.
जिकडे शेखर गोरे तिकडे विजय हे समीकरण –
गतवेळी झालेल्या पालिका निवडणुकीत शेखर गोरे विरुध्द जयकुमार गोरे असा सामना रंगला होता, त्या निवडणुकीत शेखर गोरे यांनी नगराध्यक्ष पदासह पालिकेची सत्ता ताब्यात घेतली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याने मंत्री गोरे हे मोठ्या फरकाने विजयी झाले होते, तर म्हसवड पालिका निवडणुकीत ही शेखर गोरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आपले सर्व उमेदवार माघारी घेत मंत्री गोरे यांना पाठींबा दिला होता, त्याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणावर झाल्याचे या निवडणुकीत दिसुन आल्यानेच जिकडे शेखर गोरे तिकडे विजय असे नवे राजकिय समीकरण बनले असल्याचे दिसुन आले.०००
