
म्हसवड दि २३ ( महेश कांबळे )
नुकत्याच झालेल्या म्हसवड पालिकेच्या निवडणुकीत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एकहाती सत्ता मिळवताना सर्वच ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडुन आणुन विरोधकांना व्हाईट वॉश देताना नवा इतिहास रचला आहे, या नव्या इतिहासासोबतच येथील सूर्यवंशी दांपत्यानीही निवडुन येत आणखी एक इतिहास रचला आहे.
म्हसवड पालिकेची स्थापना ही १८५७ च्या काळातील असुन या पालिकेला ऐतिहासिक वारसा आहे, आशीया खंडातील सर्वात जुन्या पालिकेतील म्हसवड पालिका एक आहे. या पालिकेने आजवर अनेक राजकिय स्थित्यांतरे पाहिली आहेत. अनेकांनी सत्ता उपभोगताना आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, तर काहीजण नामधारी म्हणुनच गणले गेलेत. अनेक राजकिय स्थित्यांतरे पाहणार्या या पालिकेने यंदा झालेल्या पालिका निवडणुकीत नवीन राजकिय बदल पाहिला आहे, तो बदल घडवण्याची किमया येथील युवराज सूर्यवंशी व स्नेहल सूर्यवंशी या दांपत्याने केली आहे.
पालिकेच्या इतिहासात प्रथमच शहरातील पती, पत्नी ने एकत्रित निवडणुक लढवण्याचा आणी निवडुन येण्याचा सम्मान पटकावताना नवा इतिहास रचला आहे, अर्थातच हा नवा इतिहास रचताना मंत्री गोरे यांचेच त्यांना मोठे पाठबळ मिळाल्याचे हे दांपत्य जाहीरपणे सांगत असले तरी एकाच पालिकेत एकाच पार्टीतुन पती, पत्नी निवडुन येण्याची ही पालिका इतिहासातील पहिलीच वेळ असल्यानेच सूर्यवंशी दांपत्याचे विशेष कौतुक व अभिनंदन शहरात होत आहे.
वास्तविक पाहता निवडणुक जाहीर झाल्यापासुन सूर्यवंशी यांच्यातील कोणाला एकाला उमेदवारी मिशेल असे सर्वच स्तरातुन बोलले जात होते, मात्र नेहमीच धक्कातंत्र देणार्या ना. गोरे यांनी यावेळी सूर्यवंशी पती, पत्नी या दोघांनाही उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांचे डोळे विस्फारले, अनेकांना हा निर्णय अत्यंत चुकीचा वाटला तर अनेकजण नाराजही झाले मात्र मंत्री गोरे यांनी एकदा शब्द दिला की ते प्रमाण बनते हे ही येथील जनतेने अनुभवलेले आहे. मंत्री गोरे यांनी दिलेला शब्द खरा करुन दाखवण्यासाठी मग युवराज सूर्यवंशी व स्नेहल सूर्यवंशी या पती, पत्नी ने अक्षरशा पायाला भिंगरी बांधुन प्रचाराची अशी काही राळ उडवुन दिली की त्या राळेतुन त्यांची प्रचाराची गाडी सुसाटपणे धावत विजयी स्टेशनवरच येवुन थांबली.
एकीकडे मंत्री गोरे यांनी पालिकेवर सत्ता स्थापन करताना २१/० ने विरोधकांना व्हाइट वॉश देत नवा इतिहास रचला तर याच निवडणुकीत सूर्यवंशी दांपत्यानीही वेगवेगळ्या प्रभागातुन निवडुन येत पालिका निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी केल्याने सन २०२५ ही पालिका निवडणुक ही सर्वांसाठी अविस्मरणीय अशी राहिल असे राजकिय विश्लेशकांतुन बोलले जात आहे.०००
