म्हसवड दि. १५ ( महेश कांबळे )
निष्ठावंत कार्यकर्ता हा कोणत्याही राजकिय पक्षाचा, पार्टीचा खर तर मुख्य कणा असतो, तो कणाच जर मजबूत नसेल तर राजकिय पक्ष ढासळण्यास वेळ लागत नाही हे आपण सर्वांनी आजवर पाहिले आहे, ज्यांच्याकडे निष्ठावंत कार्यकर्ते नाहीत ते राजकिय पक्ष सध्या गंटागळ्या खात आहेत, प्रत्येक निवडणुकीत हेच निष्ठावंत कार्यकर्ते आपल्या पक्षाला, नेत्याला विजयी बनवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतात, मात्र निवडणुका संपल्या की कार्यकर्त्यांना सोईस्कर बाजुला केले जाते.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची सर्वत्र धामधुम सुरु आहे, अशातच मात्तबर नेतेमंडळींकडुन निवडुन येणार्या उमेदवारांची शोधाशोध सुरु आहे, मात्र हा निकष लावताना तो उमेदवार निवडुन येण्याबरोबरच धनाड्य असावा असा अलिकडे नवा ट्रेंड नेतेमंडळींनी राजकारणात आणला असल्याने इमाने – इतबारे पक्षाची, नेत्यांची कामे करणार्या सामान्य कार्यकर्त्याला या ट्रेंडमुळे संधी मिळणार की तो कायमच या नेत्यांच्या सतरंज्या उचलण्याचे काम करणार असा सवाल सर्वसामान्य कार्यकर्त्यांतुन विचारला जात आहे.
निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा पैसा विरुद्ध कार्य हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत आहे. गावपातळीवर वर्षानुवर्षे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, संकटाच्या काळात धावून जाणारे, समाजासाठी-झटणारे कार्यकर्ते निवडणुकीच्या वेळी मात्र मागे पडतात. तर पैशांची ताकद, गटबाजी आणि दिखाव्याच्या बळावर उमेदवार मैदानात उतरतात आणि निवडून येतात. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे, की पैसा असेल तरच निवडणुक लढवावी का? अनेक ठिकाणी निवडणुकीचा स्वरूप खर्चीक होत चालला आहे. प्रचारासाठी गाड्या, पोस्टर-बॅनर, जेवणावळी, माणसे फिरवणे यासाठी लाखोंचा खर्च होत असल्याने ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाही अशा कार्यकर्त्यांना सुरुवातीपासूनच स्पर्धेत अडचणी येतात. हेच कार्यकर्ते वर्षानुवर्षे सामाजिक कामात गुंतलेले असतात, लोकांच्या अडी अडचणीत हजर असतात, पण मतदानाच्या वेळी मतदार तो चांगला माणूस आहे एवढेच सांगतात, मत मात्र पैशावर किंवा गटबाजीत आधारलेल्या उमेदवारांनाच नेतेमंडळी निवडणुकीचे किरीट देतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे खरे सामाजिक कार्यकर्ते निवडणुकीत कोलमडतात आणि पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्यांचा विजय होतो. लोकशाहीत मतदार राजा असतो, पण जर मतदारांनी सजगपणे विचार न करता पैशावर, लाभावर आधारित मतदान केले, तर विकासाच्या प्रश्नांवर त्याचे दूरगामी परिणाम होतात. निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात आणि नंतर ती वसूल करतात, ही कटू वस्तुस्थिती आहे. समाजासाठी सातत्याने काम करणाऱ्यांना खरा पाठिंबा मिळावा यासाठी मतदारांनी आपली मानसिकता बदलण्याची आणि विकासाला प्राधान्य देणारे मतदान करण्याची गरज आहे. निष्ठावंताने पक्षासाठी आयुष्यभर सतरंज्या उचलाव्यात का त्यांची पक्षापोटी असलेली निष्ठा फक्त सतरंज्या उचलण्याचेच कामी येणार का ? त्या सामान्य कार्यकर्त्याला नेतेमंडळी निष्ठा म्हणुन स्वत: च्या ताकतीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार नाहीत का ? असा सवाल या कार्यकर्त्यांकडुन विचारला जात असला तरी त्यांचे सवाल खरोखरच नेते, पक्ष कधी घेणार काय हा खरा तर मुख्य सवाल आहे. खरे तर कोणत्याही पक्षाला कार्यकर्त्यांनी गरज असतेच त्यातल्या त्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांची तर फार आवश्यकता असते मात्र नेते, पक्षच निष्ठावंत राहिले आहेत का ? हा खरा प्रश्न आहे, नेतेच निष्ठावंत नाहीत मात्र प्रत्येक नेत्याला, त्यांच्या पक्षाला कार्यकर्ता मात्र निष्ठावंत हवा आहे.
अनेक कार्यकर्ते आपल्या गावात, मतदारसंघात लोकांमध्ये काम करून नाव निर्माण करतात, परंतु तिकीट वाटपाच्या वेळी गटबाजी, आर्थिक ताकद, वरच्या स्तरावरील शिफारसी, राजकीय सौदेबाजी यांना प्राधान्य दिले जाते. परिणामी जमिनीवर खऱ्या अर्थानि पक्षासाठी घाम गाळणारे कार्यकर्ते उपेक्षित राहतात. त्यांना तू तर आपला आहेस या एका वाक्यात शांत केले जाते. हे कार्यकर्ते वर्षानुवर्षे नेतृत्वाची मान मर्यादा सांभाळतात, सभा गाजवतात, पोस्टर लावतात, बँनर वाहतात, जनतेत प्रचार करतात, पण निर्णायक क्षणी त्यांच्यासाठी दरवाजे बंद होतात, अशाच निर्णायक क्षणी कार्यकर्त्यांनी जर आपल्या घराचे दरवाजे बंद केले तर ही नेतेमंडळी कोणाचे दरवाजे ठोठावणार असा प्रश्न ही यानिमीत्ताने उपस्थित होत आहे.
पैशातुन सत्ता अन् सत्तेतुन पैसा हे राजकिय समीकरण बनल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता कधीच मोठा होत नाही तो आयुष्यभर कार्यकर्ता म्हणुनच जगतोय आणी जगत आलाय ही राजकिय वस्तुस्थिती आहे, ही परिस्थिती बदलणार की जसा नेत्याचा मुलगा पुढे नेताच बनतो तशी कार्यकर्त्यांची मुले ही पुढे कार्यकर्तीच बनुन जगणार असा सवाल निर्माण होवु नये यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील हुशार, उच्च शिक्षित तरुणांनाही राजकिय संधी निर्माण झाली पाहिजे किंबहुना नेत्यांनी तशी संधी कार्यकर्त्यांना उपलब्ध करुन दिली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने तरुणाई राजकारणाकडे आकर्षित होईल, त्यांच्यातील टँलेंटचा त्यांच्या गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला किंबहुना राज्यासह देशाला फायदा होईल असे राजकिय दिग्गज तज्ञांकडुन मत व्यक्त होत असुन, ही प्रणाली गावपातळीवरील राजकारणातुन देशपातळीवरील राजकारणात राबवली गेली तरच खर्या अर्थाने देशातील लोकशाही टिकेल असे ही तज्ञांकडुन बोलले जात आहे.
