म्हसवड दि. १७ ( महेश कांबळे )
म्हसवड नगरपरिषदेच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी आज उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने यादिवशी सर्वच इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आजचा दिवस पालिका निवडणुक कार्यालय हॉस्पॉट ठरल्याचे दिसुन आले. पालिकेचे नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतुन असल्याने या पदासाठी १२ महिलांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर २० सदस्यांसाठी एकुण १२३ अर्ज पालिकेत दाखल झाल्याने अर्ज स्विकृतीचा शेवटचा दिवस चांगलाच गाजला.
म्हसवड पालिका निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यापासुन शनिवारी व सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सोमवार दि.१७ हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने याच दिवशी सर्व इच्छुकांनी आपले अर्ज दाखल करीत पालिका निवडणुक ही अटीतटीची होणार असल्याचे संकेत दिले. म्हसवड पालिकेचे नगराध्यक्ष पद हे खुल्या वर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे, याच पदासाठी अनेक मात्तबर मंडळींनी आपल्या सौभाग्यवतींना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे, या पदासाठी शेवटच्या दिवशी ९ महिलांनी भाजपकडुन आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर एकुण १२ महिलांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पालिकेत यंदा २० सदस्य राहणार असुन १० महिला सदस्य तर १० पुरुष सदस्य संख्या आहे, पालिकेचे नगराध्यक्ष पद ही महिलेसाठी आरक्षित असल्याने यंदा पालिकेत महिलाराज होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर नगराध्यक्ष पदासाठी भाजप विरुध्द राष्ट्रवादी असा सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपकडुन सर्वाधिक इच्छुकांचे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असुन मोठ्या रँलीने येत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सध्या जरी या पदासाठी १२ महिलांनी आपले उमेदवारी अर्ज भरले असले तरी प्रत्यक्षात मात्र ९ महिलाच या स्पर्धेत उतरल्या आहेत. या पदासाठी भाजपकडुन सौ.पुजा सचिन विरकर, सौ.कांता शंकर विरकर, सौ. सुवर्णा सुनील पोरे, सौ.प्राजक्ता शुभम पोरे, सौ.गौरी विशाल माने, सौ. जयमाला विशाल विरकर, तर बहुजन समाज पक्षाकडुन सौ. रुपाली वाल्मिक सरतापे, राष्ट्रवादी पक्षाकडुन सौ. भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने, श्रीमती हिंदमालादेवी राजेमाने आदी महिलांनी आपले नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सौ. गौरी विशाल माने यांच्यासह सौ. भुवनेश्वरी तेजसिंह राजेमाने, श्रीमती हिंदमालादेवी राजेमाने या महिलांनी आपले पक्षातुन व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत.
तर पालिकेतील एकुण २० सदस्यांसाठी १२३ सदस्यांनी आपले अर्ज दाखल केल्याने ही निवडणुक अटीतटीची होणार असल्याचे चित्र दिसत आहे. पालिका निवडणुक ही दुरंगी होत असल्याचे चित्र दिसत असुन एकास एक उमेदवार राहिल्याने ही निवडणुक अधिक रंगतदार बनणार आहे. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे हे आपल्या विश्वासु सवंगड्याना सोबत घेवुन ही निवडणुक लढवत आहेत तर भाजप विरोधी सर्व गट एकत्र आले असुन यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी व दोन्ही शिवसेनेसह रासप हे सर्वजण एकत्र आल्याचे दिसुन येत आहे.
आज दोन्हीकडच्या उमेदवारांनी शक्ति प्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले भाजपच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी अरुण गोरे हे उपस्थित होते, तर विरोधी गटासाठी प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभय जगताप आदीजण उपस्थित होते.
चौकट –
नगराध्यक्ष पदासाठी व सदस्य पदासाठी पालिकेत अनेकांचे अर्ज दाखल झाले असले तरी २१ नोव्हेंबर रोजी यातील किती अर्ज राहतील यावर पालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी आता कोण अर्ज काढणार, कोण ठेवणार याकडे सामान्य मतदारांचे लक्ष लागले असुन २१ पर्यंत आपल्याला अडचणीचा ठरणारा उमेदवार कसा माघार घेईल यासाठी संभाव्य उमेदवारांनी फिल्डींग लावयला सुरुवात केली आहे.००
