म्हसवड दि.२१ ( महेश कांबळे )
सिध्दनाथाच्या नावानं चांगभल”च्या जयघोषात गुलाल खोब-याची उधळण करीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरीचा रथ मिरवणुकीने श्रींच्या शाही विवाह सोहळ्याची सांगता आज शुक्रवार दि २१ नोव्हेंबर रोजी देव दिवाळी दिवशी रथोत्सवाने झाली.
यंदा म्हसवडची यात्रा मोठ्या प्रमाणावर भरली होती या झालेल्या श्रींच्या रथावर भाविकांनी उधळण केलेल्या गुलाल-खोब-याने संपुर्ण यात्रा परिसर गुलालमय होऊन गेला. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, मध्यप्रदेश राज्यामधील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले म्हसवड येथील श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरीचं मंदीर माण नदीच्या काठावर आहे. तेराव्या शतकात हेमाडपंथीय बांधकामाचा उत्कृष्ठ नमुना म्हणुन या मंदीराची ख्याती आहे. श्री सिध्दनाथ काशी विश्वेशरचा अवतार संबोधला जातो. दीपावली पाडव्यास पारंपारिक पध्दतीने श्री सिध्दनाथ माता जोगेश्वरीचा शाही विवाह सोहळा उत्सवाचा प्रारंभ होतो. श्रींच्या उत्सव मुर्तींना हळदी लावणे, त्यानंतर तुलशी विवाहच्या मध्यरात्री विवाह सोहळा व विवाहा नंतर आज देवदिवाळीस वधु-वराची वरात म्हणेजच रथ मिरवणुकीने या शाही विवाह सोहळ्याची सांगता केली जाते. आज सोहळ्यास लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती लावली होती.
रिंगावण पेठ मैदानातून संपर्ण नगरप्रदक्षिणेस भावींकानी चार चाकी रथ दुपारी पाऊने तीन वाजता ढोलाचा निनाद होताच सिध्दनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषणांनी सारा परिसर दुमदुमुन गेला. भाविकांना जाड दोरखंडाच्या साह्याने श्रींचा रथ हाताने ओढीत मार्गस्थ केला. उपस्थित भाविकांनी गुलाल-खोब-याची उधळण केली. नारळाची तोरणे नवसाची रंगबिरंगी निशाणे रथावर बांधण्यास भाविकांची झुंबड उडाली होती.
श्रींच्या रथाचे स्वारस्य येथील रथाचे मानकरी राजेमाने परिवारातील ,श्रीमंत गणपतराव राजेमाने , श्रीमंत शिवराज राजेमाने, श्रीमंत प्रतापसिंह राजेमाने, श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने , श्रीमंत तेजसिंह राजेमाने , श्रीमंत दिपसिंह , श्रीमंत विश्वजित राजेमाने, श्रीमंत सयाजीराजे राजेमाने यांनी केले.
यंदाच्या रिंगावण यात्रेचा रथमार्ग हा रथमार्गातील माणगंगा नदीपात्रात पाणी असल्यामुळे हा रथ बायपास मार्गाने नेण्यात आला ज्या बायपास मार्गाने हा रथ मार्गस्त केला जातो त्या रथमार्गाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातुन तब्बल 1कोटी 40 लाख बजेट असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण काम ही पुर्ण झाले असल्याने रथोत्सव निर्विघ्न पार पडला.
तर यात्रेत आलेल्या भाविक भक्तांना यात्रेतील भुरटय़ा चोरांचा सामना करावा लागल्याने यात्रेत अनेक ठिकाणी पाकिट मारीच्या घटना घडल्या तर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्या.त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्ताविषयी भाविकांच्यातुन नाराजी व्यक्त केली जात होती.
श्रींच्या रथाचे दर्शन माण खटावचे आमदार व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्हा बैंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणिस अभयसिंह जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत-, तहसिलदार विकास अहिर , मुख्याधिकारी डॉ सचिन माने- , गुलाब उगल मोगले,,माजी नगराध्यक्ष, ,विजय धट , सुरेश म्हेत्रे, डॉ वसंत मासाळ, युवराज सुर्यवंशी, इंजि सुनील पोरे, लुनेश विरकर, पालिकेचे अभियंता चैतन्य देशमाने आदीनी दर्शन घेतले.
संपूर्ण नगरप्रदक्षणा करुन रथ मुळ ठिकाणी रात्री १२ वाजलेनंतर पोहचल्यावर पुन्हा एकदा भाविकांनी श्री. सिध्दनाथाच्या नावानं चांगभले चा गजर केला.
चौकट –
श्रींचा रथ हा भाविक मोठ्या दोरखंडाच्या साह्याने ओढत असले तरी त्यांच्या मनगटात बळ हे येथील घडशी सालकर्याने अखंडपणे वाजवत असलेल्या ढोलाच्या आवाजानेच येत असल्याची भाविकांची भावना असुन घडशी सालकरी नंदकुमार धुमाळ यांना साथ देण्यासाठी त्याच समाजातील इतर ढोल्यांची मदत होते, तर या रथासोबतच डवरी सालकरी ही डमरुची साथ करीत असल्याने च भाविकांचा उत्साह रथ ओढण्यासाठी दुणावत असल्याचे भाविकगण सांगतात.
श्रींच्या रथोत्सवानिमीत्त यात्रा पटांगण सजले –
श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीच्या रथोत्सवानिमीत्त शहरात भव्य अशी यात्रा भरली असुन या यात्रेत बाळगोपाळांचे मनोरंजन करण्यासाठी भव्य असे पाळणे आले आहेत, तर विविध प्रकार ची दुकाने थाटली आहेत, रात्रीच्या वेळी विद्युत प्रकाशाच्या झगमटात यात्रेचे नयनरम्य असे दृष्य दिसत असल्याने सर्वांनाच यात्रेचे आकर्षण वाटत आहे.
पोलीसांकडुन नेटके नियोजन –
यात्रा काळात येणार्या भाविकांची गैरसोय होवु नये, वाहतुक कोंडी होवु नये याकरीता म्हसवड चे स.पो. नि. अक्षय सोनवणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, तर यात्रेतील मुख्य ठिकाणाची सातारच्या बॉंब शोधक पथकाकडुन तपासणीही करण्यात आली, यावेळी पथकातील श्वानाने मंदिर परिसर व रथ परिसराची तपासणी केली.०००
