म्हसवड दि. २२
म्हसवड पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी प्रचाराचा कोणताच मुद्दा नसल्याने येथील कुळाच्या जमिनीचा मुद्दा उकरुन काढला असला तरी कुळाच्या जमिनीचा विषय हा आमचा व संबधित शेतकर्यांचा आहे. तो विषय त्यांचा नाही मात्र काहीतरी कागद दाखवुन शेतकर्यांची दिशाभुल मंत्री महोदय करीत आहेत, कुळाच्या जमिनीचा प्रश्न फक्त येथील राजेमाने कुटुंबच सोडवणार आहेत, आणी तो प्रश्न मार्गी लागणार असल्याची स्पष्टोक्ती येथील युवा नेते अँड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
म्हसवड येथे मंत्री जयकुमार गोरे यांनी पालिका निवडणुक प्रचारादरम्यान येथील राजेमाने परिवारावर चिखलफेक केली होती, त्याला उत्तर म्हणुन अँड पृथ्वीराज राजेमाने यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ना. गोरे यांच्यावर कडाडुन हल्ला केला, यावेळी बोलताना अँड राजेमाने म्हणाले की सध्या म्हसवड नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, यामध्ये मंत्र्याकडे कोणताच ठोस असा प्रचाराचा मुद्दा नसल्याने त्यांनी हा कुळाच्या जमिनीचा मुद्दा उकरला आहे, मात्र त्यांना माहित नाही का की यामध्ये आम्ही व संबंधित शेतकरीच हा विषय समोरासमोर बसवुन मिटवु शकतो, कुळाच्या जमिनीचा जो कागद तुम्ही दाखवत आहात तो कागद एखाद्या तज्ञ वकिलाला दाखवा, मी सुध्दा एक वकीलच आहे, अशी कागदे दाखवुन जनतेची फसवणुक करु नका, आम्ही आजवर आमच्या जमिनी लोकहिताकरीता दान केल्या आहेत, आपल्या सारख्या कोणाकडुन लुबाडल्या नाहीत, आपली जमिनीचे प्रकार सर्व जनतेला माहित आहेत. मायणीचे भिसे प्रकरण असो अथवा लोणावळा जमिनीचे प्रकरण असो यामध्ये आपण काय केले हे सर्वांनाच माहित आहे. येथील एम. आय.डी. सी. ला गेलेली शेतकर्यांची जमिन कोणी खरेदी केली आहे, कुळाच्या जमिनीचा निकाल खरा काय लागला आहे याची जनतेला माहिती द्या, पालिका निवडणुकीतच हा विषय आपण कसा काय हाती घेतला, आपण २००९ साली माणच्या राजकारणात आलाय तर कुळ जमिनीचा विषय हा २००८ सालापासुन न्यायालयात आहे, आजवर आपण यात लक्ष का घातले नाही. माझे वडील कै. विजयसिंह राजेमाने यांनी येथील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी याकरीता स्वत: ची जमिन शिक्षण संस्थेला दिली आहे, आज त्या संकुलनातुन हजारो विद्यार्थी शिकुन कोठे अधिकारी झालेत तर कित्येकजण नोकरीला आहेत, राजेमाने परिवाराच्या ज्या जमिनी आज संबधित शेतकर्यांकडे आहेत त्या शेतकर्यांकडुन राजेमाने परिवारातील एकानेही गवताची एक काडीही कधी घेतली नाही हे आपणच संबंधित शेतकर्यांना विचारावे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार चालतो असे ही शेवटी अँड. राजेमाने यांनी सांगितले.
यावेळी श्रीमंत तेजसिंह राजेमाने, जयसिंह राजेमाने, अभय जगताप, बाळासाहेब माने, यासह बहुतांशी कार्यकर्ते उपस्थित होते.


