म्हसवड दि.
मी मंत्री असताना एका वर्षात साडे १२ हजार कोटीची विकासकामे केली होती ती सर्व कामे ही महादेव जानकर च्या खिशातुन केली नव्हती तर ती जनतेच्या टँक्सच्या पैशातुन केली आहेत, तेव्हा कोणी मंत्री जर मी विकास केला म्हणत असेल तर त्याच्या घरातील पैशाने केलेला नाही, मी कधी मंत्री पदाचा आव आणला नाही, मला माण तालुका हा भयमुक्त व दहशतमुक्त करायचा आहे. मी एन.डी. चा घटक पक्ष म्हणुन पंतप्रधानांसोबत बसुनच येथील कोरोडॉल चा पहिला प्रस्ताव दिला आहे तेव्हा कोणी मी केले, मी केले असे म्हणत असेल तर ते त्याच्या खिशातुन नाही करत हे लक्षात ठेवा ते तुम्ही दिलेल्या टँक्सच्या पैशातुन होत असतात असा घणाघात माजी मंत्री महादेव जानकर यांनी म्हसवड येथे झालेल्या कोपरा सभेत बोलताना केला.
म्हसवड पालिका निवडणुकीच्या निमीत्ताने सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या कोपरा सभेत ते बोलत होते, यावेळी खासदार धै्यशिल मोहिते – पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, जिल्हा बँंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, प्रा. कविता म्हेत्रे, अभयसिंह जगताप, किशोर सोनवणे, तेजसिंह राजेमाने, अँड. पृथ्वीराज राजेमाने, प्रा. विश्वंभर बाबर, अरविंद पिसे यासह आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी मंत्री जानकर म्हणाले की माझ्यावर विश्वास ठेवुन म्हसवडकरांनी भाजपविरोधी आघाडी केली आहे त्यामध्ये समविचारी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे, म्हसवडकरांना भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, व दहशतमुक्त म्हसवड पाहिजे यासाठीच म्हसवडकरांनी एक वज्रमुठ केली आहे.
यावेळी खासदार धैर्यशिल मोहिते – पाटील बोलताना म्हणाले की म्हसवड शहराचा विकास हा कॉग्रेस, राष्ट्रवादीच्याच काळात झाला आहे, गत १० वर्षापासुन राज्यात भाजपची सत्ता आहे, या काळात किती विकास झाला हे म्हसवडकरांनीच लक्षात घ्यावे, येथील माणगंगा नदीवरील पुल हा सुध्दा तत्कालीन मंत्री विजयसिंह मोहिते – पाटील यांच्याच सहकार्याने झाला आहे, तर जे पाणी सध्या म्हसवडकर पित आहेत ते पाणीही आमच्या माळशिरसमधुनच येतंय, गार्डन सुध्दा विजयदादांनीच मंजुर केलेले आहे. मात्र शहरात सध्या मी केलं चा नारा दिला जातोय, येथील जनता भयभित आहे, प्रशासनाची ही येथे दडपशाही सुरु आहे, ही दडपशाही, गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी सर्व सुज्ञ म्हसवडकरांनी सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, जिथे, जिथे आमची गरज भासेल तिथे मी तुमच्या सोबत उभा राहिल, म्हसवड शहर सुसंकृत बनवण्यासाठी, युवा पिढी आदर्श बनवण्यासाठी आपण सर्वांनी संकल्प करुयात सिध्दनाथ नागरिक आघाडीला विजयी करुयात असे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख म्हणाले की म्हसवड शहराचे बसस्थानक पुर्ण व्हायला १५ वर्ष लागलीत, या बसस्थानकाच्या कामाला कोणी खोडा घातला याची परिपूर्ण माहिती म्हसवडकरांना आहे, शहरात विकासाचे स्तोत्र उभारायचे असेल तर सर्वांनीच या आघाडीच्या पाठीशी राहवे, महिलांचा सन्मान ज्या पवार साहेबांनी केला त्याच पवार साहेबांचा आदर्श घेवुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार वाटचाल करीत आहेत, ज्या राजमाता अहिल्यादेवीचे नाव तुम्ही घेता त्यांचा आदर्श ही जरा घ्या असे म्हणत देशमुख यांनी ना. गोरे यांना टोला हाणला, म्हसवड शहरात एम.आय. डी. सी. झाली पाहिजे हे आमचेही म्हणणे आहे मात्र त्यासाठी कोणा शेतकर्यांच्या जमिनी ओरबाडु नका, त्यांच्याशी चर्चा करा त्यांच्या अडचणी सोडवा, त्यांच्यावर दहशत गाजवु नका. म्हसवड हे एक रोल मॉडल बनवण्याचा आमचा अचेंडा आहे त्यासाठी आपल्या सर्वांची एकीची वज्रमुठ हवी आहे. छ. शिवाजी महाराजांकडे थोडेच मावळे होते, पण त्यांनी एकीच्या बळावर औरंगजेबाला नामोहरण केले, अशीच तुमची वज्रमुठ ठेवा आपणीही राजकिय बदल घडवु असे आवाहन शेवटी देशमुख यांनी केले.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी शहराच्या परिस्थितीवर बोलताना ना. गोरे यांच्यावर कडाडुन हल्ला केला त्यांनी सांगितले की शहरातील सर्वसामान्य जनतेला प्रशासनाच्या आडुन त्रास दिला जातोय, शहराचा विकास मी केला असा कांगावा केला जातोय त्यांना माझे सांगणे आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत आणी ते या राज्याचे अर्थखाते संभाळत आहेत. मी येथे कोणावर टिका करायला अलो नाही मात्र तुम्ही च्या परिवर्तन पँनेल ला शिव्या घालता त्या परिवर्तनला आता मांडीवर घेवुन बसलाय म्हसवड शहराचे वाटोळे परिवर्तन पँनेल केलं म्हणता त्याच परिवर्तनचे किती संवगडी आता तुमच्या सोबत तुम्ही घेतलेत, ते का घेतलेत ते पण जरा म्हसवडकरांना सांगा, उमेदवारी अर्ज भरताना सुध्दा आपण आपल्याच कार्यकर्त्यांना फसवता, ज्यांना आपण फसवले आहे ते कार्यकर्तेच आता तुम्हाला या निवडणुकीत फसवल्याशिवाय राहणार नाहीत. फसवा, फसवीचे हे धंदे बंद करण्यासाठीच म्हसवडची जनता आता एकवटलेली आहे, जो स्वत:च्या कार्यकर्त्यांना फसवतो त्यांना खोटं बोलतो तो म्हसवडकरांशीही खोटे बोलणार, म्हसवडचा विकास मी केला म्हणणार्यांनी मग येथील पाणी येत नाही, रस्ते खराब आहेत याचीही जबाबदारी स्विकारावी, जे चांगले ते मी केलं अन् जे वाईट ते तुम्ही केलं असे म्हणणारी प्रवृत्ती या निवडणुकीत गाढुन टाका असे आवाहन शेवटी देसाई यांनी केले.
यावेळी शरदचंद्र पवार गटाचे नेते अभयसिंह जगताप, प्रा. कविता म्हेत्रे, किशोर सोनवणे अँड. पृथ्वीराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने यांनीही चौफेर फटकेबाजी करीत भाजपवर कडाडुन हल्ला करीत सिध्दनाथ नागरिक आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन म्हसवडकरांना केले.
यावेळी सिध्दनाथ नागरिक आघाडीने शहरात भव्य अशी पदयात्रा काढत शहरवासियांना शहराचा विकास शहराच्याच हातात द्या असे आवाहन केले.

